क़ासीद / चिखली : बुलढाणा जिल्ह्यातील अनेक भागांत गेल्या जवळपास ५० दिवसांपासून पावसाचा खंड पडल्याने खरीप पिके संकटात सापडली आहेत. सोयाबीन, तूर, कापूस, उडीद आदी पिके करपण्याच्या स्थितीत असताना शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. अशा परिस्थितीत जिल्ह्याचे पालकमंत्री व सहपालकमंत्री शेतकऱ्यांच्या बांधावर दिसत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
याच पार्श्वभूमीवर शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष देविदास कणखर, क्रांतीकारी शेतकरी संघटनेचे विनायक सरनाईक यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी चिखली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांच्यामार्फत मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तक्रार अर्ज सादर केला. तहसीलदार व पोलीस प्रशासनाकडेही शेतकऱ्यांनी आपल्या मागण्या मांडत शासनाचे लक्ष दुष्काळी परिस्थितीकडे वेधले.
आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांनी “काजू-बदाम घ्या, पण शेतकऱ्यांच्या बांधावर या”, “शोधून द्या, शोधून द्या, पालकमंत्री शोधून द्या” अशा घोषणांनी प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला. शेतकऱ्यांच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला.
‘बैठका नको, शेतकऱ्यांच्या बांधावर या’
तक्रार अर्जात नमूद केल्यानुसार, जिल्ह्यातील दुष्काळसदृश परिस्थितीची पाहणी करण्यासाठी पालकमंत्री व सहपालकमंत्र्यांनी प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन परिस्थितीची पाहणी करणे आवश्यक आहे. काजू-बदामाच्या चर्चेपेक्षा दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर येऊन त्यांच्या अडचणी समजून घेणे महत्त्वाचे असल्याचा संताप शेतकऱ्यांनी व्यक्त केला.
शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, केवळ बैठका आणि चर्चांपुरते प्रशासन मर्यादित न राहता प्रत्यक्ष शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या पिकांची सद्यस्थिती, पाण्याची उपलब्धता आणि आगामी रब्बी हंगामातील अडचणी जाणून घेणे गरजेचे आहे.
शेतकऱ्यांनी बुलढाणा जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त परिस्थितीची तातडीने दखल घेऊन दुष्काळग्रस्त क्षेत्र जाहीर करावे, तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी १ लाख रुपये नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी केली.
आक्रोषीत शेतकऱ्यांच्या घोषणांमुळे चिखली परिसरात काही काळ वातावरण दणाणून गेले होते. यावेळी देविदास कणखर, विनायक सरनाईक,उध्दव थुट्टे,मुरलीधर येवले, विठ्ठल सोळंकी, शेषराव शेळके,रवि टाले,राजु शेटे,गजानन कुटे,समंथा मोरे, रामदास शेळके,पांडुरंग घुबे, दत्ता शेळके,केशव म्हळसणे, पुरुषोत्तम म्हळसणे, मधुकर ठेंग यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.
पालकमंत्री व सहपालकमंत्र्यांचा शोध घेऊन त्यांना तातडीने बुलढाणा जिल्ह्यात पाठवावे.
दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी करावी. शेतकऱ्यांशी थेट संवाद साधून त्यांच्या अडचणी व पिकांची सद्यस्थिती जाणून घ्यावी. पिकांच्या नुकसानीचे तातडीने सर्वेक्षण करून पात्र शेतकऱ्यांना योग्य नुकसानभरपाई व शासकीय मदत द्यावी. आगामी रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांना बियाणे, पाणी व आवश्यक शासकीय मदत उपलब्ध करून द्यावी. शेतकरी संकटात असताना शासनाने शेतकऱ्यांच्या बांधावर दिसून येत प्रत्यक्ष मदत करावी. या मागण्यांकडे तातडीने लक्ष न दिल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही तक्रार अर्जातून देण्यात आला आहे. दुष्काळाच्या संकटात शेतकरी अडचणीत असताना प्रशासन व लोकप्रतिनिधींनी प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन परिस्थितीची पाहणी करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.



